मुंबई : नुकसानीचा अंतिम पंचनामा अहवाल आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले आहे. राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांवर आलेले संकट मोठे असून, त्यातून त्यांना उभारी देणे ही सरकारची जबाबदारी आहे.
सध्या प्रशासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, राज्यात पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ही प्रक्रिया काही ठिकाणी विलंबाने होत आहे. अहवाल वेळेवर न आल्यास ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाला उशीर होऊ शकतो. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
ढगफुटी आणि अतिवृष्टीचा फटका
यंदा अनेक जिल्ह्यांत सलग पावसाचे सत्र, ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर क्षेत्रातील पिके उध्वस्त झाली. अनेक घरांची छपरे उडाली, रस्ते वाहून गेले आणि नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत.पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे.सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे जलसंपदा विभागाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक इतका गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे, हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती असल्याची माहिती देण्यात आली. माजलगाव धरणातून 41,701 क्युसेक इतका विसर्ग, हा पूर्वी 95,000 क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून 75,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. उजनीमधून 1 लाख क्युसेक इतका विसर्ग होत असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती आहे. ही माहिती सकाळी 9 वाजतापर्यंतची असल्याची माहिती आहे.